
खानापूर : गेल्या काही महिन्यांपासून खानापूर परिसरात झालेल्या विविध चोरीच्या घटनांचा खानापूर पोलिसांनी यशस्वीपणे तपास लावला आहे. वेगवेगळ्या चार ठिकाणी झालेल्या चोरीच्या प्रकरणांचा पोलिसांनी तपास करत आरोपींकडून १४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जप्त केलेला हा मुद्देमाल आणि आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक रॉयल एनफिल्ड मोटारसायकल, एक कॅनन कॅमेरा, जेसीबीसाठी वापरण्यात येणारी मागील बकेट आणि हार्ड रॅक मशीन तसेच चोरीसाठी वापरलेले टाटा एस मालवाहू वाहन आणि एक कार असा एकूण १४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणांबाबत अधिक माहिती अशी की, २ जुलै २०२५ रोजी गर्लगुंजी येथील महेश विठ्ठल कुंभार यांनी खानापूर शहरातील विद्यानगरमधील गणेश कॉलनी येथील त्यांच्या घराच्या आवारात उभी असलेली रॉयल एनफिल्ड मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात खानापूर पोलिसांनी वैज्ञानिक पद्धतीने तपास करत जोयडा येथील समीर सूरज पाटील याला अटक केली. त्याच्याकडून २ लाख ९० हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. दुसऱ्या एका चोरीच्या प्रकरणात, कॅनन कॅमेरा आणि लेन्स जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींकडून एकूण ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज आणि मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या असून, आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. आणखी एका प्रकरणात, एका चोराने काही जेसीबीचे सुटे भाग चोरले होते. या चोरीच्या प्रकरणातही सुमारे ४.८० लाख रुपये किमतीचे सुटे भाग आणि चोरीसाठी वापरलेले टाटा एस मालवाहू वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात शोएब रफीक मारीहाळ (आंबेडकर गल्ली परिसर), शुभाणी राजेश तोलगी (बडस क्रॉस परिसर), आतिफ सलाउद्दीन सनदी (कराची गल्ली परिसर) आणि अजीज बाशासाब तल्लूर (आंबेडकर गल्ली परिसर) या संशयित आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, ४ मार्च २०२५ रोजी, बेळगाव येथील वडगावच्या सोनार गल्लीतील श्रीमती सुनिता विष्णू लोहार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, खानापूर तालुक्यातील गंगवाली गावाजवळ उभी असलेली त्यांची कार चोरांनी चोरली होती. या चोरीच्या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी सुमारे ४.५० लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. अशा एकूण चार प्रकरणांमध्ये १४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत बैलहोंगल डीएसपी वीरय्या मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर पोलीस निरीक्षक एल. एच. गौंडी, पोलीस उपनिरीक्षक एम. बी. बिरादार, ए. ओ. निरंजन पीएसआय (अतिरिक्त) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी जगदीश काद्रोळी, बी. जी. यलिगार आणि इतर सहभागी होते.

Belgaum Varta Belgaum Varta