
खानापूर : मराठीच्या रक्षणासाठी तालुक्याच्या प्रत्येक गावातून मोर्चात मराठी भाषिकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे यासाठी अनेक ठिकाणी जनजागृती केली जात आहे त्याला सर्वच ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मोर्चा यशस्वी होईल असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
मध्यवर्ती समितीतर्फे सोमवारी कन्नड सक्ती विरोधात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाबाबत खानापूर तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी माचीगड, कापोली आदी भागात जनजागृती केली.
यावेळी आबासाहेब दळवी यांनी मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे फक्त समितीच्याच कार्यकर्त्यांनी नव्हे तर तालुक्यातील प्रत्येक मराठी भाषिकानी कन्नडसक्ती विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. त्यामुळे गावागावातून कार्यकर्त्यांनी मोर्चात अधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच समितीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चाच्या जनजागृतीसाठी पत्रकांचे वाटप केले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी तालुका समितीचे सुनील पाटील, राजाराम देसाई, नागेश भोसले, मिलिंद देसाई, जगनाथ देसाई, संदीप देसाई, तानाजी देसाई यांच्यासह इतर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta