खानापूर : ग्रामीण भागातील सरकारी मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मराठी माध्यमाला प्राध्यान्य द्यावे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने खानापूर तालुक्यातील माचीगड, अनगडी, हलसाल, कापोली, शिवठाण, कुंभारवाडा, बाळगुंद, श्रीकृष्णनगर, नागरगाळी, तावरकट्टी, गोदगिरी, तारवाड, बामणकोप आदी भागातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी माचीगड शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी आबासाहेब दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील अनेक जण नोकरी निमित्त विविध ठिकाणी जात आहेत. त्यामुळे गावांमध्ये नागरिकांची संख्या कमी होत असल्याचा परिणाम सरकारी शाळांवर होत आहे. तरीही गावात असलेल्या पालकांनी व शाळा सुधारणा कमिटीने शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. मातृभाषेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कमी पडत नाहीत तसेच इतर माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे नोकरी लागते हा गैरसमज देखील पालकांनी दूर करून घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले.
पीएलडी बँकेचे संचालक पप्पू पाटील यांनी प्रास्ताविक केले. तुकाराम जाधव, सुनील पाटील आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मिलिंद देसाई, सुनील पाटील, राजाराम देसाई यांच्यासह शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta