सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मादार यांची तालुका पंचायतला तक्रार
खानापूर : मागील तीन-चार वर्षांपूर्वी गुंजी ग्रामपंचायतच्या आवारात काँक्रिटीकरण करून सुसज्य रस्ता व परिसर सुंदर करण्यात आला आहे असे असताना याच काँक्रिटीकरणावर पुन्हा लाखो रुपये खर्च करून पेव्हर्स बसवण्याचा घाट गुंजी ग्रामपंचायतने घातला आहे. नुकताच या पेव्हर्स बसवण्याच्या कामाचे पूजनही ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत विकास अधिकारी यांनी तसेच सदस्यांनी हाती घेतले आहे. भक्कम काँक्रिटीकरण असताना पुन्हा शासनाचा निधी त्या ठिकाणी खर्च करण्याची गरज नाही असे असताना हा घाट कशासाठी? असा प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंचचे तालुकाध्यक्ष व गावातील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मादार यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत तसेच तालुका पंचायतला तक्रार दाखल केली आहे. गाव परिसरात अनेक ठिकाणी पंचायतीचा निधी खर्च करून सुसज्ज परिसर बनवण्यासाठी सारख्या जागा आहेत त्या विकासाकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आहे. मात्र काँक्रिटीकरणावर पुन्हा पेव्हर्स काम करण्याचे नियोजन सुरू असून शासनाच्या या निधीचा दुरुपयोग अशा प्रकारे होत असेल तर या विरोधात ठोस आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta