

खानापूर : हेल्मेट नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून निवृत्त सैनिकाला पोलिसांकडून बुटांनी मारहाण केल्याची निंदनीय घटना खानापूर तालुक्यातील नंदगड येथे घडली आहे, त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच नियम धाब्यावर बसवत वयोवृद्ध निवृत्त सैनिकावर अमानुष्यवृत्ती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील नंदगड येथे घडली आहे. हेल्मेट नाही म्हणून थांबवलेल्या माजी सैनिकाला चक्क चार ते पाच पोलिसांनी मारहाण करत जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये ओढत नेल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर जोरदार व्हायरल होत असून पोलिसांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
उपलब्ध माहितीनुसार नंदगड येथील एका चौकात सदर निवृत्त सैनिक हेल्मेट न घालता गाडी चालवत असल्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबविले. यावेळी पोलिसांनी नियमबाह्य कारवाई करत सदर निवृत्त सैनिकाला मारहाण केली व पोलीस स्टेशनमध्ये नेले. याबाबत नंदगड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांची संपर्क साधून विचारणा केली असता हेल्मेट नव्हते, कागदपत्रे नाहीत याचा जाब पोलिसांनी विचारल्यास निवृत्त सैनिकांनी पोलिसांवर हात उगारला असे उत्तर देत पोलिसांनी विषय झटकून उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की, पोलिसांनी केलेला दावा चुकीचा आहे, वयोवृद्ध व्यक्ती पोलीसांवर हात उगारु शकत नाही. चूक पूर्णपणे पोलिसांचीच आहे. कायदा मोडला तर दंडात्मक कारवाई करणे हे पोलिसांचे नियमानुसार कर्तव्य होते परंतु सामान्य नागरिकांना बुटाने मारहाण करून पोलिसांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. पोलिसांचे हे वागणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. या घटनेमुळे नागरिकांनी गृहमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. देशसेवा केलेल्या सैनिकाचा सन्मान करण्याऐवजी त्याला बुटाने मारहाण करणे हे मानवतेला काळीमा फासणारे कृती आहे. नंदगड पोलिसांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी मागणी देखील नंदगड ग्रामस्थांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta