
खानापूर : गर्लगुंजी येथे एकलव्य क्रीडा अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या भव्य खो-खो स्पर्धेत म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथील खेळाडूंनी आपल्या वेगवान चाली, अचूक टच, धारदार चेसिंग आणि भक्कम बचावाच्या जोरावर बेळगाव जिल्ह्यातील मातब्बर संघांना अक्षरशः घाम फोडत उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात केवळ एक गड्याच्या फरकाने विजेतेपद निसटले, मात्र खेळाडूंचा खेळ पाहता त्या निसटत्या पराभवातही विजयाची झलक होती. ट्राॅफी एक व्हिकेटने हुकली पण खो- खो चाहत्यांची मनं मात्र ताराराणी सोबत झुकली!
स्पर्धेच्या प्रारंभापासूनच ताराराणीच्या संघाने आक्रमक चेसिंग, लांब डायव्ह, अचूक पोल टर्न आणि क्षणात दिशा बदलणाऱ्या चालांनी उपस्थित क्रीडाप्रेमींना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. आपल्या बाणेदार आणि शिस्तबद्ध खेळातून त्यांनी प्रत्येक सामना पूर्ण वेळ नियंत्रणात ठेवत प्रतिस्पर्धी संघांना चकित केले.
खो-खोमध्ये वर्चस्व असलेल्या येळ्ळूर, सुळगा, कडोली तसेच खानापूर तालुक्यातील नामांकित संघांना लीलया पराभूत करत ताराराणीच्या खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम सामन्यात बेळगाव परिसरातील खेळाडूंची भरणा असलेल्या, बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मराठी विद्यानिकेतन संघाविरुद्ध रंगलेली लढत शेवटच्या क्षणापर्यंत थरारक ठरली. शेवटच्या टचपर्यंत विजयाची आशा असताना एक गड्याच्या फरकाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तरीही खेळाडूंचा खेळ सर्वांनीच उभे राहून दाद देण्यास भाग पाडणारा होता.
या स्पर्धेत ताराराणी संघातील स्टार खेळाडू कुमारी अपेक्षा महेश निलजकर हिने आपल्या वेगवान चेसिंग, अचूक निर्णयक्षमता आणि अपवादात्मक चपळतेच्या जोरावर ‘बेस्ट चेजर’ हा मानाचा किताब पटकावून संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
हे संपूर्ण यश मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यादव यांच्या ‘मिशन ऑलिंपिक’ या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाला नवी उभारी देणारे ठरले आहे. त्यांच्या प्रेरणेतून खेळाडूंनी केवळ स्पर्धा खेळल्या नाहीत, तर ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या क्रीडा लौकिकात सुवर्णाक्षरांनी भर घातली.
या खेळाडूंना महाविद्यालयाचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील व प्राचार्य अरविंद लक्ष्मणराव पाटील यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभत असून, युवा प्रशिक्षक श्रीयुत प्रशांत पाखरे व सहकारी प्रशिक्षक श्री. मळीक यांच्या अचूक रणनीती, कसून सराव आणि तांत्रिक मार्गदर्शनाखाली संघाने ही कामगिरी साकारली आहे.
या यशस्वी वाटचालीनंतर ताराराणीच्या खेळाडू आता कर्नाटक स्टेट खो-खो असोसिएशन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी टुमकूर जिल्ह्य़ातील टिपटूर येथे रवाना झाल्या असून, ही स्पर्धा दिनांक १८ डिसेंबर २०२५ ते २१ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे. विशेष म्हणजे कुमारी साक्षी विष्णू देवलतकर, कुमारी अपेक्षा महेश निलजकर, कुमारी लक्ष्मी मोहन हंगीरकर, कुमारी वैष्णवी यल्लाप्पा पाटील व कुमारी प्रणाली पांडूरंग पाटील या खेळाडूंची बेळगाव जिल्ह्याचे राज्यस्तरीय नेतृत्व करणाऱ्या संघात निवड झाली आहे, ही बाब महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
या सर्व खेळाडूंचा भव्य गौरव सोहळा मराठा मंडळाचे संचालक श्री शिवाजीराव पाटील व प्राचार्य अरविंद पाटील यांच्या उपस्थितीत, पालकांच्या समवेत संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री एन. ए. पाटील, प्रा. आर. व्ही. मरित्तमन्नावर तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta