
खानापूर : ९५ वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षणदानातून बहुजन समाजाला मराठा मंडळ शिक्षण संस्थेने सातत्यपूर्ण दिशा दिली आहे. मराठा मंडळ शिक्षण संस्था स्थापना दिन व बालिका दिन (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती) यांचा संयुक्त सोहळा खानापूर येथे ताराराणी प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेच्या स्थापनेमागील वैचारिक अधिष्ठान, सामाजिक बांधिलकी आणि बहुजन समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. श्री नाथाजीराव हलगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मराठा मंडळ ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्राचार्य अरविंद पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
३ जानेवारी १९३१ – शिक्षणक्रांतीचा ऐतिहासिक दिवस
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्राचार्य अरविंद पाटील यांनी ३ जानेवारी १९३१ हा दिवस मराठा समाजाच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला असल्याचे सांगितले. “काही संस्था केवळ काळाच्या ओघात उभ्या राहत नाहीत, तर त्या काळाला दिशा देण्यासाठी जन्म घेतात. मराठा मंडळ शिक्षण संस्था ही अशाच ध्येयवेड्या विचारातून उभी राहिलेली संस्था आहे,” असे ते म्हणाले.
बहुजन समाज अज्ञानात राहिला, तर स्वातंत्र्य अपूर्ण राहील या ठाम विचारातून काही ध्येयवेडे शिक्षक, विचारवंत आणि समाजहितचिंतक एकत्र आले आणि मराठा मंडळ शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, असे त्यांनी नमूद केले. हा विचार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षणाच्या क्रांतिकारी भूमिकेशी आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘शिक्षण हा हक्क आहे’ या तत्त्वज्ञानाशी थेट नाते सांगणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काटकसरीतून उभा राहिलेला शिक्षणाचा वटवृक्ष
संस्थेच्या इतिहासातील १९७७ हा निर्णायक टप्पा असल्याचे सांगताना प्राचार्य पाटील म्हणाले की, कै. श्री नाथाजीराव हलगेकर साहेब यांनी केवळ २८८ रुपयांच्या शिल्लकीवर संस्थेची जबाबदारी स्वीकारली. त्या काळात शिक्षणसंस्था चालवणे हे मोठे आव्हान होते; मात्र त्यांच्या काटकसरीपणा, प्रामाणिक नियोजन आणि समाजकेंद्री दृष्टिकोनामुळे मराठा मंडळाने संथ गतीचा प्रवास सोडून झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल केली.
त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाले. ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या दारातले अडथळे दूर झाले. त्यांच्या कार्याची दखल म्हणून त्यांना शिक्षण महर्षी पुरस्कार, अरिहंत पुरस्कार व मराठा समाज भूषण पुरस्कार बहाल करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी शिक्षणाचे आशास्थान
मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या कार्याचा केंद्रबिंदू हा ग्रामीण भाग असल्याचे सांगताना प्राचार्य पाटील यांनी विशेषतः ताराराणी हायस्कूल व ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर यांचा उल्लेख केला. “आज या संस्थांमध्ये खेडोपाड्यातील, दुर्गम व ग्रामीण भागातील मुली मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या कुटुंबांतील विद्यार्थिनींना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य मराठा मंडळ सातत्याने करत आहे,” असे त्यांनी सांगितले.
आदरणीय अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यादव यांच्या नेतृत्वाखाली संस्थेला आधुनिकतेचे नवे परिमाण लाभले असल्याचे त्यांनी नमूद केले. सुसज्ज इमारती, प्रगत प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण, स्मार्ट वर्गखोल्या यांसोबत संस्कार, संस्कृती आणि सामाजिक भान जपण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या कार्याची दखल म्हणून मिळालेला राणी चन्नम्मा पुरस्कार आणि अलीकडेच कर्नाटक शासनाने बहाल केलेला कर्नाटक राजोत्सव पुरस्कार हा मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या कार्याचा राज्यस्तरीय गौरव असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा मंडळातून घडलेले हजारो विद्यार्थी प्रशासन, शिक्षण, वैद्यकीय, अभियांत्रिकी, उद्योग, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, ते जिथे जिथे पोहोचले तिथे मराठा मंडळाची संस्कारशील ओळख घेऊन गेले असल्याचे प्राचार्य पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. श्री पी. व्ही. कर्लेकर यांनी केले.
या कार्यक्रमास ताराराणी हायस्कूल व ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथील सर्व कर्मचारीवर्ग व खेडोपाड्यातून आलेल्या विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta