
खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्था संचलित म मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथे प्रामाणिकतेचा एक प्रेरणादायी सोहळा अनुभवायला मिळाला. अठ्ठावीस फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या पी.यू.सी. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी वार्षिक परीक्षेच्या पार्श्वभूमीवर “आम्ही परीक्षेत कोणत्याही प्रकारची कॉपी करणार नाही” अशी सामूहिक शपथ घेत संपूर्ण परिसरात सकारात्मकतेची नवी उर्जा निर्माण केली.
सुरुवातीला वाणिज्यशास्त्राचे प्राध्यापक श्री. पी. व्ही. कर्लेकर यांनी विद्यार्थिनींना परीक्षेला सामोरे जाताना घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. उत्तरपत्रिकेची नीटनेटकी मांडणी, प्रश्नपत्रिकेचे बारकाईने वाचन, वेळेचे योग्य नियोजन आणि आवश्यक साहित्याची तयारी याबाबत त्यांनी सविस्तर सूचना दिल्या.
प्रस्तावनेत वर्ग शिक्षिका प्रा. श्रीमती एम. वाय. देसाई यांनी अभ्यास आणि परीक्षा याचा समन्वय साधायचे तंत्र सांगितले. त्याचबरोबर त्यांनी परीक्षेचा काळ हा केवळ गुणांचा नव्हे, तर स्वभावातील प्रामाणिकतेची कसोटी असतो, असे सांगत विद्यार्थिनींना प्रेरित केले. त्यानंतर इतिहास विषयाच्या अभ्यासिका प्रा. वनिता गावडे यांनी शपथ वाचन केले. सर्व विद्यार्थिनींनी एकमुखाने प्रामाणिकतेचा निर्धार व्यक्त करत सभागृह दणाणून सोडले.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, “परीक्षेचा काळ हा आपल्या प्रतिभेचा शोध घेण्याचा सुवर्णकाळ असतो. शांतपणे अभ्यासावर भर देऊन उत्तरपत्रिका उत्तम दर्जाच्या कशा होतील, प्रत्येक गुणाचे महत्त्व काय आहे आणि यशासाठी आत्मविश्वास किती आवश्यक आहे,” यावर त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच परीक्षेदरम्यान आवश्यक साहित्य, शिस्त आणि मानसिक स्थैर्य याबाबतही त्यांनी विद्यार्थिनींना सूचना दिल्या.
या प्रसंगी ज्येष्ठ प्रा. श्री. एन. ए. पाटील, प्रा. श्री. टी. आर. जाधव, प्रा. आर. व्ही. मरित्तमन्नावर, प्रा. श्रीमती जे. एफ. शिवठणकर यांची उपस्थिती लाभली.
मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यादव या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त आणि प्रामाणिकतेची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या प्रेरणेतूनच अशा उपक्रमांना अधिक बळ मिळत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.
हा शपथविधी केवळ औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर विद्यार्थिनींमध्ये सचोटी, आत्मविश्वास आणि स्वअनुशासनाची ज्योत प्रज्वलित करणारा क्षण होता. परीक्षा म्हणजे केवळ गुणांची शर्यत नसून चारित्र्याची घडण असते, हा संदेश या उपक्रमातून ठळकपणे अधोरेखित झाला. शेवटी आभार प्रदर्शन कला शाखेच्या वर्ग शिक्षिका प्रा. श्रीमती एस सी कणबरकर यांनी आभार मानले.
या विधायक गोष्टीमुळे निश्चितच, म मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा हा निर्धार पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरेल आणि प्रामाणिकतेची ही उज्ज्वल परंपरा अधिक भक्कम करेल…..
Belgaum Varta Belgaum Varta