Tuesday , March 10 2026
Breaking News

नारीशक्तीत देश चालवण्याची ताकद; महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणासाठी महिला दिन साजरा

Spread the love

 

खानापूर : नारीशक्ती ही फार मोठी शक्ती असून महिला तालुका, जिल्हा तसेच देशही सक्षमपणे चालवू शकते, हे आपण अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणासाठी महिला दिन साजरा केला जातो, असे मत पंचहमी योजनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
खानापूर तालुका पंचहमी योजना समितीच्या वतीने मंगळवारी (ता.१०) खानापूर येथील शिवस्मारक येथे महिला दिन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला पंचहमी योजनेचे कार्यदर्शी व ईओ रमेश मैत्री, सीडीपीओ अधिकारी विक्रम के.बी. यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात झाडांना पाणी घालून करण्यात आली. यावेळी बोलताना सूर्यकांत कुलकर्णी म्हणाले की, तालुक्यात पंचहमी योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत आतापर्यंत २७ हप्त्यांद्वारे प्रत्येकी महिलेच्या खात्यात ५४ हजार रुपये जमा करण्यात आले असून एकूण सुमारे ३५० कोटी रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तसेच शक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील महिलांना ५३ कोटी ९१ लाख रुपयांचा लाभ झाला आहे. गृहज्योती योजनेतून ५७ कोटी २४ लाख रुपये देण्यात आले असून अन्नभाग्य योजना भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने राबवून सर्वांना रेशन वाटप करण्यात येत आहे.
युवा निधी योजनेअंतर्गत तालुक्यातील सुमारे १८०० युवकांना लाभ मिळत असून या योजनेबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला सुरक्षित राहिल्यास समाज व तालुका सुरक्षित राहील, यासाठी प्रशासनाकडून मासिक बैठकीत आढावा घेतला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी महिला ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा सावित्री मादार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
महिला दिनाचे औचित्य साधून गृहलक्ष्मी योजनेतून मिळालेल्या निधीचा योग्य उपयोग केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मागी पिंटो, देमक्का हतरवाड, मलप्रभा कमार, अंजली ठोंबरे, दिशा कवटणकर, पार्वती नाईक, लक्ष्मी मेनसे, गीता मादार, शायीदा परस, दीपाश्री पाटील, तुळसा गुरव, रुक्मिणी भेकणे, पूजा उपसकर, रेखा कुंभार आदी महिलांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला वैष्णवी पाटील, अनिता दंडगल, गीता आंबटगट्टी, प्रियांका गावकर तसेच पंचहमी योजनेचे सर्व सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ

Spread the love  खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ उत्साहात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *