खानापूर : गणेबैल टोलनाक्यावर रविवारी सकाळी अनपेक्षित प्रकार घडल्याने टोल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नेहमीप्रमाणे कर्मचारी सकाळी आठ वाजता कामावर हजर झाले असता टोल कलेक्शन कॅबिनला टाळे लावलेले असून टोलनाका बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार टोलचालकाने टोलनाका बंद ठेवला असून यामागे टोलचालक व एनएचएआय यांच्या संगनमताने कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. किमान वेतनाची मागणी केल्यामुळेच हा प्रकार घडत असल्याचे कर्मचारी सांगत असून गोरगरीब भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
किमान वेतन मागणे हा गुन्हा आहे का, असा सवाल उपस्थित करत कर्मचाऱ्यांनी एनएचएआयने या प्रकरणात हात झटकू नये, अशी मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणीही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
तसेच स्थानिक खासदारांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली असून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, टोलनाका बंद असतानाही कर्मचारी सकाळी आठ वाजल्यापासून आपल्या जागेवर हजर राहून आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजते.
Belgaum Varta Belgaum Varta