
खानापूर : खानापूर तालुक्यातील चिखले-आमगाव रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.
खानापूर तालुक्यातील चिखले- आमगाव हा सहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. चिखले गावाच्या रस्त्याचे यापूर्वी डांबरीकरण झाले आहे. मात्र चिखलेपासून आमगावला जाणाऱ्या संपर्क रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले की खड्ड्यात रस्ता? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन आपली वाहने चालवत आहेत. नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
चिखले-आमगाव हा खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या गावांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे रुग्णांना वयोवृद्ध नागरिकांना तसेच गरोदर महिलांना दवाखान्यात घेऊन जाण्यास त्रास होत आहेत. रस्ता खराब असल्यामुळे रुग्णवाहिका देखील जाऊ शकत नाही. शाळकरी मुलांना शाळेला जाताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी डॉ. सरनोबत यांनी केली आहे. चिखले -आमगाव संपर्क रस्ता 25 वर्षांपूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. मात्र या रस्त्याचे आजपर्यंत फक्त मेंटलींग करण्यात आले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींनी पाट फिरविली आहे. चिखले- आमगाव रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा या यासाठी भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अर्जुन गावडे यांच्यासह रुक्मिणी गावडे, सरस्वती घाडी, चंद्रकांत घाडी, यशोदा घाडी, आनंदी गावडे यांच्यासह आमगाव, चिखले गावातील नागरिक व महिला वर्ग उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta