खानापूर : मराठा मंडळ हायस्कूल खानापूर येथील सहशिक्षक परशराम मेलगे यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली.
मेलगे यांचे इंग्रजी विषयावर प्रभुत्व आहे. सदर हायस्कूलच्या 2018-2019 च्या माजी विद्यार्थ्यांतर्फे परशराम मेलगे यांचा सत्कार करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत तनुजा लाड हिने केले.
यावेळी तनुजा लाड म्हणाली की, परशराम मेलगे सर हे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाबद्दल एक प्रकारची अनामिक भीती असते मात्र कडक शिस्तीच्या मेलगे सरांनी आमच्या मनातून ही भीती काढून इंग्रजी विषय सोप्या पद्धतीने शिकविला. त्यामुळे आम्हाला महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेताना खूप मदत झाली.
सत्काराला उत्तर देताना परशराम मेलगे म्हणाले की, शिक्षकी सेवेतून समाज घडविण्याची संधी शिक्षकांना मिळते. त्यामुळे मी शिक्षकी सेवेत असण्याचा मला अभिमान वाटतो. ग्रामीण भागातून विद्यार्थी खानापूर येथे येतात त्यातील काही मुले शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवतात. अश्या विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान वाटतो, असे म्हणून विद्यार्थ्यांचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाला उदय कापोलकर, राजन यादव, लक्ष्मण गावडे, राजेश पाटील, वैभव चोरलेकर, योगेश गावडे, माधवी होनगेकर, ज्योविना मस्करेन, वैभवी सुंडकर आदी विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta