कोल्हापूर : राज्यातील मुदत संपलेल्या ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक घेण्याचे आदेश शुक्रवारी (दि. ८ जुलै) राज्य निवडणुका आयोगाने जाहीर केला. ज्या जिल्ह्यात पर्जन्यमान कमी आहे, त्या भागातील पालिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा देखिल समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगूड आणि कुरुंदवाड नगरपालिकांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी २२ जुलै ते २८ जुलैला उमेदवारांनी अर्ज दाखल करावयाचे आहेत. तर १८ ऑगस्ट रोजी मतदान आणि १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून राहिलेल्या नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम अखेर शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा समावेश असून ब वर्गातील जयसिंगपूर व क वर्गातील गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगूड आणि कुरूंदवाड या नगरपालिकांचा समावेश आहे. तर पन्हाळा व मलकापूर या दोन नगरपालिका यातून वगळण्यात आल्या आहेत. तसेच इचलकरंजीमध्ये महानगरपालिका झाल्याने त्याचाही यात समावेश केलेला नाही. या पालिकांसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. जिल्हाधिकार्यांनी २० रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावयाचा असून, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शनिवारपासून (दि. ९) या पालिकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यावर्षीही ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची सुविधा केली आहे. दि. २२ ते २८ जुलै या दरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. यामध्ये सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दि. २९ जुलै रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ४ ऑगस्ट २०२२ पर्यंत राहणार आहे. त्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप होईल. ४ ते १८ ऑगस्ट असा १४ दिवसांचा कालावधी उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहे.
पालिकेच्या निवडणुका या नेमक्या कधी लागणार याबाबत प्रचंड उत्सुकता असताना शुक्रवारी निवडणूक आयोगाचा थेट निवडणुकीचा कार्यक्रमच जाहीर झाल्याने इच्छुकांच्या खळबळ उडाली आहे. पालिका निवडणुकीची तयारी आता जोरदार होणार असून, जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा समावेश असल्याने जवळपास संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागू होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
अर्ज दाखल करणे : दि. २२ ते २८ जुलै
अर्ज छाननी : २९ जुलै
अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ ऑगस्ट
अपिल असल्यास : ८ ऑगस्टपर्यंत अर्ज मागे
मतदान : १८ ऑगस्ट
मतमोजणी : १९ ऑगस्ट