कोल्हापूर : नवीन पाणी कनेक्शन मंजूरीसाठी १० हजारांची लाच घेताना महापालिका शहर पाणी पुरवठा विभागाचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. राजेंद्र बळवंत हुजरे (वय ४५, रा. आर. के. नगर) असे संशयिताचे नाव आहे. रंकाळा स्टॅन्ड परिसरात ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे महापालिकेकडील मान्यताप्राप्त प्लंबर आहेत. त्यांनी दोन ग्राहकाचे नवीन पाणी कनेक्शन मंजूरीसाठी शिवाजी मार्केटमधील शहर पाणी पुरवठा विभागाकडे अर्ज केला होता. कनेक्शन जोडणीचे प्रकरणी मंजूरीसाठी राजेंद्र हुजरे याने मंगळवारी तक्रारदाराकडे १० हजारांच्या लाचेची मागणी केली.
पैसे स्विकारण्यासाठी कार्यालयाबाहेर
कनिष्ठ अभियंता हुजरे याने मागणी केलेल्या लाचेबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. यानतंर पडताळणीमध्ये त्याने त्याने मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर शिवाजी मार्केटमधील कार्यालयात सापळा रचण्यात आला होता. पण, हुजरे याने पैसे घेवून तक्रारदाराला रंकाळा स्टॅन्ड परिसरात बोलावले. याठिकाणी त्याने १० हजार रुपये स्विकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलिस उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, संजीव बंबरगेकर, शरद पोरे, संदीप पडवळ, रुपेश माने यांनी ही कारवाई केली.