कोल्हापूर : हुपरी येथे आज राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने टाकलेल्या छाप्यात दोघा तरूणांना ताब्यात घेतले आहे. दोघे तरूण सख्खे भाऊ असून पथकाने त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. ताब्यात घेतलेल्या पैकी एक जण एका फौंडेशनच्या माध्यमातून हुपरी रेंदाळ परिसरात कार्यरत आहे. तो एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याचे समजते.
एनआयएच्या पथकाने पहाटे चारच्या सुमारास हुपरी-रेंदाळ दरम्यान असलेल्या अंबाबाई नगर मधील एका घरात छापा टाकला. यावेळी 30 ते 35 वर्षाच्या दोघा भावाना ताब्यात घेतले. पथकाने ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पथकाने येथे तब्बल सात तास चौकशी केली. संबंधित तरुणांच्या आई वडिलांकडूनही काही माहिती घेतल्याचे समजते.
येथील चौकशी पुर्ण करून पथकाने दोघांनाही सकाळी अकराच्या सुमारास कोल्हापूरला घेऊन गेले आहेत. दरम्यान, कोणालाही कुणकुण न लागता एनआयए पथकाचा ताफा पहाटेच धडकल्याने परिसरात खळबळ उडाली असून तर्क वितर्क वर्तवण्यात येत आहेत.
ताब्यात घेतलेल्या पैकी एक जण एका फौंडेशनच्या माध्यमातून येथे कार्यरत आहे. त्यांने एका जिल्ह्यातील केंद्रात शिक्षण घेतलेले आहे. त्याच्या वडीलांचा मजूरीवर चांदी काम करण्याचा व्यवसाय आहे. गेल्या कांही महिन्यांपासून सामाजिक क्षेत्रात त्याचा सहभाग वाढला होता. पहाटे अचानक चार व्हॅनमधून आलेल्या पथकाने संबंधित तरुणाच्या घराची झडती घेतली.