कोल्हापूर : राष्ट्रीय तपास संस्थेने गेल्या दोन दिवसांत देशभरातील 15 राज्यांमधील 93 ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर छापेमारी केली. यामध्ये महाराष्ट्रातील 20 जणांचा समावेश असून त्यामधील एक कोल्हापूर शहरातील आहे. मौला मुल्ला (वय 38, सिरत मोहल्ला, सुभाषनगर) असे त्याचे नाव आहे. त्याला नाशिक येथील न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, मौला मुल्लाचे क्राईम रेकॉर्ड खराब असल्याने याच्या कारनाम्याची कोल्हापूर पोलिस दलामार्फत चौकशी सुरू आहे.
वादग्रस्त डिजिटल फलक लावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
संशयिताच्या संपर्कातील दहा ते बारा स्थानिक साथीदार पोलिसांच्या रडारवर असल्याचे कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. बलकवडे म्हणाले, ’टेरर फंडिंगप्रकरणी संशयाच्या भोवर्यात सापडलेल्या ‘पीएफआय’चा स्थानिक पदाधिकारी मौला मुल्लाच्या वर्षभरातील हालचाली संशयास्पद होत्या. राजारामपुरी पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले होते. गतवर्षी 6 डिसेंबर 2021 मध्ये विक्रमनगरमध्ये सार्वजनिक ठिकाणी वादग्रस्त डिजिटल फलक लावून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केला होता.’
पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुल्ला एनआयए-एटीएसच्या जाळ्याला लागला
चौकशीत त्याचं नाव निष्पन्न होताच गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली होती. राजारामपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे संशयित मौला मुल्ला ‘एनआयए’-‘एटीएस’च्या जाळ्याला लागला. संशयित मुल्लासह त्याच्या साथीदारांकडून समाजविघातक कृत्ये घडली असल्यास नागरिकांनी त्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालय अथवा राजारामपुरी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्यांना द्यावी. संबंधितांच्या नावाबाबत गोपनीयता पाळण्यात येईल, असेही बलकवडेंनी स्पष्ट केले.