कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजे गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी गोकुळ दूध उत्पादकांना फरक देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे दूध उत्पादकांची दिवाळी दणक्यात होणा आहे. यंदा दूध उत्पादकांना 102 कोटी 83 लाखाचा फरक दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम दूध उत्पादकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
दरम्यान मागच्या वर्षीपेक्षा यंदा 19 कोटी रुपये इतकी ज्यादा रक्कम मिळणार असल्याची माहिती गोकुळचे नेते, हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी दिली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघांचे अध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित होते.
यंदा सत्ताधाऱ्यांनी बचतीचे धोरण राबवल्याने टँकर वाहतूक, रोजंदारी कर्मचारी कपात, महानंदा पॅकिंग खर्च बचत, दूध वाहतूक टेम्पो भाडे कपात, दूध पावडर विक्री नफा या सर्व बचतीतून 17 लाख दरफरकातील 6%, महिन्याचे व्याज 62 लाख रुपये, डीबेचर्स व्याज 6 % प्रमाणे 15 लाख, संस्था डीव्हीडंड 11 % प्रमाणे 65 लाख असे एकूण 19 कोटी 4 लाख ज्यादाची मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये गेल्या वर्षी सत्तांतर झाल्यानंतर नेते मंडळींनी चेअरमनपदाची धुरा माझ्याकडे सोपविली. या कालावधीत राबविलेल्या सभासदहिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार यासंबंधी मांडणी करणे गरजेचे आहे.
माजी ग्रामविकासमंत्री आमदार हसन मुश्रीफसो, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटीलसो व आघाडीचे सर्व नेते मंडळी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व माझ्या सर्व सहकारी संचालक यांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याने तसेच दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, कर्मचारी यांच्या योगदानाने ‘गोकुळ’ ची दिमाखात वाटचाल सुरु आहे याचा मला मनस्वी आनंद असल्याचे ते म्हणाले.