कोल्हापूर (जिमाका) : मध्यवर्ती एस.टी. बस स्थानक परिसरात असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामास गती द्यावी. यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामाचा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे काम दर्जेदार आणि गतीने होणे गरजेचे आहे. या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. पुतळा सुशोभिकरण करताना या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय, त्यांचे कार्य याची सचित्र माहिती देण्यात यावी. त्यांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयाचे येथे प्रदर्शन होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामानंतर या ठिकाणच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेच्या उद्यान विभागाने घ्यावी, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत दिल्या.
तत्पूर्वी राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी मध्यवर्ती एस.टी. बस स्थानक परिसरात असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
Check Also
मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे
Spread the love जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …