कोल्हापूर (जिमाका): पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील वळीवडे व जठारवाडी येथील सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर काही वारकरी जखमी झाले होते. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांची आज जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांत्वनपर भेट घेऊन धीर दिला.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, तहसीलदार शीतल मुळे-भामरे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. तसेच जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही मदत मृतांच्या वारसांना लवकरच देण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले. या मदतीमुळे दु:ख कमी होणार नसले तरीदेखील कुटुंबियांना आधार मिळावा या भूमिकेतून शासनाच्या वतीने ही मदत देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
जुनोनी येथे अपघातात मृत्यू झालेल्या वळीवडे, ता. करवीर येथील कै. सुनीता उत्तम पवार व गौरव उत्तम पवार व जठारवाडी, ता. करवीर येथील कै.शारदा आनंदराव घोडके, कै.सर्जेराव श्रीपती जाधव, कै.सुनीता सुभाष काटे, कै.शांताबाई जयसिंग जाधव, कै. रंजना बळवंत जाधव यांचे कुटुंबिय व नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्या दु:खामध्ये सहभागी असल्याचे पालकमंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले. तसेच जखमी वारकऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस करुन त्यांना धीर दिला.