Monday , December 8 2025
Breaking News

कोल्हापुरात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; साडे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. चौघा जणांच्या टोळीकडून संगणक, प्रिंटर व इतर साहित्य तसेच क्रेटा कार आणि मोबाईल फोन असा 12 लाख 62 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मरळी फाट्यावर (ता. पन्हाळा) सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मरळी फाट्यावर सापळा रचला

शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अमंलदार विजय गुरखे यांना पांढऱ्या रंगाची हुंडाई कंपनीची क्रेटा कार (एमएच-09-डीएक्स-8888) बनावट नोटा घेऊन कळे-कोल्हापूर रोडने येणार असल्याची बातमी मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मरळी फाट्यावर सापळा लावला. यावेळी संशयित क्रेटा कार आडवून कारमधील चंद्रशेखर बाळासाहेब पाटील (वय 34, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), अभिजीत राजेंद्र पवार (वय 40, रा.गडमुडशिंगी, ता. करवीर), दिग्विजय कृष्णात पाटील (वय 28, रा. जयभवानी तालमीसमोर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांची कारसह झडती घेतली. तसेच बनावट नोटा तयार करणारा संदीप बाळू कांबळे (वय 38, रा. आंबेडकर नगर, कळे, ता. पन्हाळा) याच्या घरात एकूण 4,45,900 रुपये किंमतीच्या 500 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या.

बनावट नोटा बनवण्याचं साहित्य, कार आणि मोबाईल फोन जप्त

पोलिसांच्या पथकाने त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्याचे संगणक, प्रिंटर आणि इतर साहित्यासह क्रेटा कार तसंच मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला. संशयित आरोपींविरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शेषराज मोरे, पोलीस अंमलदार विजय गुरखे, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदूराव केसरे, रणजित पाटील, दीपक घोरपडे, सोमराज पाटील आणि रफिक आवळकर आणि सायबर पोलीस ठाण्याकडील अमर वासूदेव व सुरेश राठोड यांनी केली.

पोलीस अधीक्षकांकडून कारवाईचे निर्देश

कोल्हापूर शहरात जिल्ह्यात गुन्हेगारीसह अवैध धंदेगिरी वाढतच चालल्याने माहिती मिळवून कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना दिले आहेत. पेट्रोलिंग तसेच गोपनीय माहिती काढून रेकाॅर्डवरील गुन्हेगारांना चेक करुन कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *