कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 19 फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. याच दिवशी पंचगंगा नदी काठावर भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरतीसाठी पंचगंगा घाटावर डागडुजी सुरु करण्यात आली आहे. अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदारांच्या उपस्थितीत महाआरती होईल.
त्यामुळे मनपा प्रशासनाकडून पंचगंगा नदीकाठाची स्वच्छता, तसेच किरकोळ डागडुजी सुरू केली आहे. कणेरी मठावर 20 फेब्रुवारीपासून होत असलेल्या लोकोत्सवाच्या पूर्वसंध्येला सिद्धगिरी मठाकडून पंचगंगा नदीच्या काठावर महाआरतीचे आयोजन करण्यात आलं आहे. मनपाच्या आरोग्य व पवडी विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. संपूर्ण पंचगंगेचा काठ स्वच्छ करण्यात आला आहे. मंदिरे स्वच्छ करण्यात येत आहेत. काठावरील काही फरशा निखळल्या असल्याने त्याची डागडुजी सुरू आहे. नदीकडे जाणारा रस्ता आणि पायऱ्यादरम्यान काँक्रिटीकरण केले जात आहे. काठावरील खराब झालेले लोखंडी ग्रील काढून त्याठिकाणी नवीन बसविले जात आहेत. सर्वच ग्रील रंगविण्यात आले आहेत.
दुसरीकडे भाजपकडून अमित शाह यांच्या जंगी स्वागतासाठी तयारी सुरु आहे. याच अनुषंगाने उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर्वतयारी आढावा बैठक घेत सूचना केल्या आहेत. तसेच अमित शाह यांच्या दौऱ्यात प्रस्तावित असलेल्या भेटीच्या ठिकाणांची सुद्धा पाहणी केली आहे. अमित शाह दोनदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून 18 फेब्रुवारीला ते नागपूर आणि पुण्यामध्ये येण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. न्यू एज्युकेशन सोसायटी प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलसह अनेक शाळा आणि महाविद्यालये चालवते.
शाह यांच्या पत्नी सोनल शाह सुमारे 40 वर्षांपूर्वी याच शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. शाह 19 फेब्रुवारीला कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. तसेच नागाळा पार्कमधील पक्ष कार्यालयाच्या परिसरात मंदिराची पायाभरणी करतील. भाजपचे स्थानिक नेते शाह यांच्या भव्य स्वागताच्या तयारीत आहेत. देशात पहिल्यांदाच स्थापन करण्यात आलेल्या सहकार खात्याचे मंत्रीही अमित शाह आहेत. ऊस कारखान्यांना आयकरात सवलत दिल्याने साखर कारखानदार आणि आयकर विभागातील दीर्घकाळ चाललेला वाद सोडवल्याबद्दल तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी संस्थांसाठी अनेक उपाययोजना केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्याची योजना आहे.