Monday , December 8 2025
Breaking News

कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर; गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद, कोल्हापूर-गगनबावडा मार्गही बंद

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज दुपारी तीनपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 38 फुट 2 इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 आणि धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर
पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत असल्यामुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना आता जिल्हा प्रशासनाबरोबरच ग्रामपंचायतकडूनही वेळीच स्थलांतरीत होण्याचा सूचना दिल्या जात आहेत. कोल्हापुरात महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावात सध्या ग्रामपंचायतकडून स्पीकरच्या सहाय्याने आवश्यक साहित्यासह आज (23 जुलै) सायंकाळपर्यंतच गाव सोडण्यासाठी सांगितलं जात आहे.

धरणातील पाणीसाठ्यात वाढ
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.78 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणात 81 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या स्वयंचलित दरवाज्यांपर्यंत पाणी आल्याने ते लवकर उघडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, सांगली जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील कोणते मार्ग बंद?
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 22 राज्यमार्ग असून त्यामधील 8 मार्ग बंद पडले आहेत. प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या 122 पैकी 17 मार्ग बंद आहेत. त्यामुळे एकूण 25 मार्ग बंद पडले आहेत. जिल्ह्यात 54 घरांची पडझड झाली आहे.

शहरासह जिल्ह्यात पावसाचे पाणी वाढत चालल्याने कोल्हापूर- गगनबावडा मार्ग बंद झाला आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मांडूकली आणि लोंघे गावातील मार्गावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून कोकणसह गोवा, पणजी, तळेरे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ठिकाणी होणारी वाहतूक बंद झाली आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा
तुळशी 1.45 टीएमसी, वारणा 23.83 टीएमसी, दुधगंगा 10.69 टीएमसी, कासारी 2.11 टीएमसी, कडवी 1.90 टीएमसी, कुंभी 2.08 टीएमसी, पाटगाव 2.31 टीएमसी, चिकोत्रा 0.67 टीएमसी, चित्री 0.94 टीएमसी, जंगमहट्टी 0.66 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेओहोळ 0.65 टीएमसी, कोदे (ल.पा) 0.21 टिएमसी असा आहे.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *