“लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज” या मानाच्या पुरस्काराची घोषणा
कागल (वार्ता) : छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कागल नगरीत श्री शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त राजे विक्रमसिंह घाटगे फांउडेशन व राजमाता जिजाउ महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते ५ नोव्हेंबर अखेर कागल शहरात प्रथमच शिक्षण संकुल कागलच्या पटांगणावर राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती समरजीतसिंह घाटगे व सौ. नवोदिता घाटगे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सौ. श्रेयादेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, कागलची राजकीय विद्यापीठ ही ओळख पुसून सामाजिक, सांस्कृतिक विचारचा कागल तालुका अशी निर्माण करायची आहे. चार दिवस चालणाऱ्या या लोकरंग महोत्सवामध्ये यावर्षी पासून शाहू जनक घराण्याच्यावतीने राज्याच्या आणि देशाच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या लोकप्रिय सम्माननीय व्यक्तीस लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज या विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. रोख रक्कम, मानपत्र, कोल्हापूरी फेटा, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असुन पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे नाव यथावकाश जाहिर करीत आहोत .
सौ. नवोदिता घाटगे म्हणाल्या, महोत्सवाची टॅग लाईन “लई भारी कागल कलाकारी” अंतर्गत होणाऱ्या राजर्षींच्या विचाराचा लोकजागर लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांचे आदर्श व समाजभिमुख विचार व स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांचे लोकहिताचे कार्य नवीन पिढीसमोर यावे यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कागलमध्ये प्रथमच असा वेगळा कार्यक्रम होत आहे. वरील महोत्सवामध्ये सर्वानी सहभागी होऊन आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षिदार व्हावे, असे आवाहन सौ. नवोदिता घाटगे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, यशवंत माने, नंदकुमर माळकर यांच्यासह ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
असे होणार कार्यक्रम
गुरुवार दि. २ नोव्हेंबर रोजी सायं. ४ वा. महोत्सव उदघाटन, सायं. ५.३० वा. दिंडी सोहळा (आकर्षक नृत्य सादरीकरण) सायं ६ वा. नामवंत कीर्तनकार यांचा किर्तन सोहळा.
शुक्रवार दि. ३ नोव्हेंबर रोजी स. १० ते दु. २ नृत्य, नाट्य गायन, संगीत, कलागुण दर्शन. सायं ४ ते रात्री १० मोरया पुरस्कार, बक्षिस वितरण, भरत नाट्यम, टॕलेंट हंट, नेत्रदिपक सजिव देखावा, धनगरी ढोल वादन सादरीकरण.
शनिवार दि. ४ नोव्हेंबर स. ९ वा. बाई पण भारी देवा, महीलांसाठी शॉर्ट फिल्म, स. ११ ते रा. ९ पर्यंत ३ लाख रुपयाच्या भव्य झिम्मा फुगडी स्पर्धा, स्पर्धा समाप्तीनंर बक्षिस वितरण हस्ते मान्यवर सेलेब्रेटी यांचे शुभ हस्ते.
रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी स. ११ वा. शिक्षकांचा गित गायन कार्यक्रम, राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण, सा. ६ वा. लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम व हास्यजत्रा.
महोत्सव विशेष………..
सार कांही एकाच ठिकाणी
चारही दिवस भव्य कृषी प्रदर्शन, विविध स्टॉल, युथ फेस्टीवल स्पेशल, मनपंसद खरेदी, महिला बचत गाटासाठी विक्री स्टाॕल, तांदूळ महोत्सव, बारा बलुतेदार यांच्या माध्यमातून ग्राम संस्कृतीचे दर्शन, चटकदार खादय जत्रा, बॉल चमुसाठी फणी गेम व करमणुक इत्यादी.