
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून चांगलाच जोर लावल्याने बराच सुखावला आहे. पाऊस पूर्णत: गायब झाल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कोल्हापूर शहरात वातावरण ढगाळ आहे. हवेत गारवाही जाणवू लागला आहे. पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रातही गेल्या दोन दिवसांत दमदार पाऊस झाल्याने काळम्मावाडी, राधानगरी, तुळशी धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी 14 फुटांवर पोहोचली आहे.
कोल्हापुरात 3 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज
दरम्यान, सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यात 3 ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर, कोकणाला ऑरेंज अलर्ट
दरम्यान, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर या जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ
कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ होत आहे. त्याचा प्रभाव कोकण आणि गोवा किनारपट्टीवर दिसत आहे. दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर सुमारे 110 किमी खोल समुद्रात हे चक्रीवादळ होत असून, पश्चिम-पणजी ते रत्नागिरी दरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सामान्य पाऊस
‘एल निनो’ हवामानाच्या पॅटर्नमुळे ऑगस्ट महिना शतकातील अधिक काळ सर्वात कोरडा ठरल्याचे भारतीय हवामान विभागाने शनिवारी सांगितले. ज्यामुळे कृषी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरातील पाऊस त्याच्या दीर्घकालीन सरासरीच्या 94 टक्के होता, जो 2018 नंतरचा सर्वात कमी आहे, असे भारतीय हवामान विभागने एका निवेदनात म्हटले आहे. आयएमडीने एल निनोचा मर्यादित प्रभाव गृहीत धरून हंगामात 4 टक्के पावसाची तूट अपेक्षित धरली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत देशात सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा आहे, हवामान खात्याने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये देशातील बहुतांश भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta