कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात परतीचा पावसाने तडाखा दिला. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दमदार परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर शहरातील कसबा बावडा, शिये परिसराला ढगफुटीसदृश पावसाने तडाखा दिला. कोल्हापूर शहर, गांधीनगर परिसरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी शिये, कसबा बावडा परिसरात अचानक ढगफुटीसदृश पाऊस सुरु झाला. त्यामुळे सर्वत्र काहीच वेळात पाणीच पाणी झाले. शिये गावात छत्रपती शिवाजी महाराज चौकातही पाणी जोरदार वाहू लागले. स्टेट बँकेच्या शाखेतही पाणी साचले. पावसाळ्यात जेवढे पाणी आले नाही ते केवळ तासाभराच्या पावसात आल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली.
कसबा बावडा परिसरातही हजेरी
शियेला लागून असलेल्या कसबा बावड्यातही ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. कोल्हापूर शहर, उपनगरांमध्येही पाऊस झाला. खड्ड्यातील रस्त्यांमुळे वाहनधारकांची चांगलीच कसरत झाली. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला.
कागलमध्येही जोरदार पाऊस
दुसरीकडे, कागल शहरातही जोरदार पाऊस झाला. जवळपास एक तास सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
गडहिंग्लजमध्येही पाऊस
गडहिंग्लजमध्येही ठिकठिकाणी पाऊस कोसळला. जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग या पिकांना गेल्या आठवड्यातील व आजच्या पावसाने दिलासा मिळाला. भात पिकाला दिलासा असला, तरी सोयाबीन काढणीला आले आहे. मळणीलाही काही ठिकाणी प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन अडचणीत येण्याची शक्यता आहे.
दाजीपुरात ढगफुटीसदृश पाऊस
दुसरीकडे, मंगळवारी पावसाचे आगार असलेल्या राधानगरी तालुक्यातील दाजीपुरात केवळ पाच तासांत तब्बल 137 मिलिमीटर पाऊस कोसळला. ढगफुटीसदृश पावसाने पाणीच पाणी झाले. कुंभी, कासारी लघु पाटबंधारे परिसरातही अतिवृष्टी झाली.