नवीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
कागल (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल शहरातील महिलांसाठी रविवार दि. ८ रोजी दसरा महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना अडीच लाखांची साडेसहाशे बक्षीस देण्यात येणार आहेत. या दसरा महोत्सवाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने प्रवीण काळबर व सौ. रुपाली काळबर यांनी केले आहे.
रविवारी गैबी चौकातील शाहू हॉलमध्ये सकाळी महोत्सवाचे उद्घाटन सिनेअभिनेत्री कावेरीफेम तन्वी मंडले यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सायरा हसन मुश्रीफ, सविता प्रताप माने, शीतल फराकटे, आशाकाकी माने, संगीता गाडेकर, पद्मजा भालबर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.
आहार मार्गदर्शक प्रांजली राजमाने यांचे यावेळी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. होम मिनिस्टर स्पर्धेकरिता पैठणीसह फ्रीज, वॉशिंग मशिन, ३२ इंची टीव्ही ही प्रमुख बक्षिसे आहेत. याचबरोबर पाककला स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा, सूप नाचविणे, घागर घुमविणे या स्पर्धाही होणार आहेत. यासाठी ओव्हन, प्रेशर कुकर, पंखा आणि अन्य संसारोपयोगी वस्तू अशी विविध बक्षिसे आहेत. नावनोंदणी केलेल्या महिलांनाच यात सहभाग घेता येणार आहे.
स्पर्धेचे बक्षीस वितरण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने व श्रीनाथ सहकारी समूहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी यांची उपस्थिती असणार आहे.
शहरातील महिलांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक प्रवीण काळबर व रूपाली काळबर यांनी केले आहे.