बेळुंकी येथे अडीच कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण
कागल (प्रतिनिधी) : गेल्या पंचवीस -तीस वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत गोरगरीब, सर्वसामान्य, कष्टकरी माणूस केंद्रबिंदू मानून काम केले आहे. मी जो मतदार संघात विकास केला आहे. तसा विकास बारामती सोडून कोणत्याच मतदारसंघात झालेला नाही. मतदारसंघात एक इंचही रस्ता डांबरीकरण विना राहिला नाही, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
बेळुंकी ता. कागल येथील अडीच कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीण भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा शितल फराकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुश्रीफ पुढे म्हणाले, दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. तरुणांच्या हाताला काम देण्याची गरज आहे. यासाठी दिवाळीनंतर कागलमध्ये भव्य रोजगार मेळावा घेणार आहे. यामधून नामांकित कंपन्यांमध्ये २५ ते ३० हजार बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देणार आहे. चिकोत्रा धरणाचे काम स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी सुरू केले होते. या कामासाठी निधीची कमतरता भासत होती. मी आमदार झाल्यानंतर निधीसाठी प्रयत्न केले. तसेच नागणवाडी धरणाची पूर्तता आपण केली.
खडकेवाडा येथे क्रिडांगण करण्यासाठी ५० लाख रुपये देऊ, तसेच प्राथमिक शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माझ्याकडून जी काही मदत लागेल ती करू. बेळुंकी येथील सांस्कृतिक भवन व गटार कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिले.
खडकेवाडा येथील योगेश स्पोर्ट्सचे संस्थापक व ग्रामपंचायत सदस्य योगेश साबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुश्रीफ गटात प्रवेश केला. त्यांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने प्रवीण भोसले, शितल फराकटे सरपंच बी. एस. कांबळे, अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच भाऊसाहेब पाटील यांनी केले. आभार विठ्ठल मगदूम यांनी मानले. कार्यक्रमास सदाशिव तुकान, नंदू पाटील, युवराज जाधव, योगेश साबळे, दत्ता पाटील, सुरेश पाटील, दीपा कुदळे, सिकंदर मकानदार, राजमहंमद मकानदार, डी. पी. पाटील, काका पाटील, संतोष पाटील, विनोद पाटील, प्रकाश माने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.