दरमहा दहा हजार पगारवाढीने कामगारांत समाधान
कागल (प्रतिनिधी) : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील इंडो काउंट प्रा. लि. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दरमहा दहा हजार रुपयांची घसघशीत पगारवाढ झाली. पगारवाढीच्या या यशस्वी कराराबद्दल कंपनीच्या कामगारांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार केला. मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये हा यशस्वी करार झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, या कंपनीमध्ये एक हजारावर कामगार कार्यरत आहेत. चार वर्षांपूर्वी झालेला पगारवाढीचा करार डिसेंबर २०२२ अखेर संपला होता. या नव्या करारामुळे गेल्या दहा महिन्यांचा फरकही कामगारांना मिळणार आहे.
यावेळी कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या शाहू स्वाभिमानी वस्त्रोद्योग कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ सांडुगडे, उपाध्यक्ष सुजित घाटगे, जनरल सेक्रेटरी गणेश घाटगे, खजानिस महादेव माने, संतोष डांगे, कृष्णात चौगुले, धनाजी हणबर, सुधीर टेळे, किरण महाजन, सुनील पाटील, आरिफ मुजावर, नागेश डेळेकर, सचिन शेणवी, कैलास खोत आदी पदाधिकाऱ्यांसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.