Sunday , December 22 2024
Breaking News

…अन्यथा एकही बस जोगनभावी कुंडाकडे जाणार नाही

Spread the love

 

कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचा इशारा

कोल्हापूर : 24 ते 27 डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा होणार आहे. या यात्रेला कर्नाटकासह महाराष्ट्रातील रेणुका भक्त मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होणार आहेत. दरम्यान प्रत्येक वर्षी डोंगरावर जाण्यापूर्वी भाविक जोगनभावी कुंडावर पवित्र स्नानासाठी जात असतात. मात्र या महत्त्वाच्या जागेची दुर्दशा आणि अस्वच्छता झालेली पाहायला मिळते. त्यामुळे यावर्षीच्या यात्रेत जोगनभावी कुंडाची स्वच्छता केली जावी. याची जबाबदारी कोल्हापुरातील मानाच्या चार जगांवर सोपविण्यात आली आहे. यात्रेदरम्यान जोगनभावी कुंडाची स्वच्छता झाली नसल्यास, जोगनभावी कुंडाकडे कोल्हापूरातील भाविकांच्या एकही बस जाणार नाही, असा इशारा कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष युवराज मोळे यांनी आज सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.
यावेळी पुढे बोलताना मोळे म्हणाले, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या जत्रेला कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने भाविक रेणुका यात्रेला जात असतात. जोगनभावी कुंडावर स्नान आणि लिंब नेसण्याचा कार्यक्रम परंपरेनुसार प्रत्येक वर्षी होत असतो. मात्र याच जोगनभावी कुंडातील पाणी प्रत्येक वर्षी अस्वच्छ असते. पाण्याला दुर्गंधी येत असते. कुंडा शेजारील जागा अस्वच्छ असते. या ठिकाणी उभारलेले स्नानाचे शोवरला कमी दाबाने पाणी असते. त्यामुळे मोठ्या संख्येने यात्रेला गेलेल्या भाविकांच्या श्रद्धेला तडा जातो. याचा विचार करून यात्रेपूर्वी सौंदत्तीला जाणाऱ्या मानाच्या चार जगांनी जोगनभावी कुंड परिसर स्वच्छ राखला जावा, कुंडातील पाणी स्वच्छ असावे, कुंडाच्या पायऱ्या व आसपासचा परिसर स्वच्छ असावा. स्नानाचे शॉवर पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र आणि बंदिस्त असावेत. या ठिकाणी स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी यासंदर्भात प्रयत्न करावेत. यात्रेपूर्वी स्वछतेची कामे पूर्ण केली जावी. जर कुंडाची स्वच्छता, व अन्य मागण्या पूर्ण न झाल्यास, कोल्हापूरातील रेणुका भक्तांच्या एकही बस जोगनभावी कुंडाकडे जाणार नाही, असा इशाराही युवराज मोळे यांनी दिला आहे.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष तानाजी चव्हाण, सरचिटणीस गजानन विभुते, कार्याध्यक्ष अशोकराव जाधव, संस्थापक सुभाष जाधव, अच्युत साळुंखे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू

Spread the love  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *