कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कसबा सांगावमध्ये घोडा मैदान स्पर्धेवेळी भीषण अपघात झाला. घोडा मैदान स्पर्धेवेळी अनेकजण उभं असलेली जीप वेगाने धावत होती. अत्यंत वेगात असलेली जीप वळणावर अंदाज न आल्याने जमिनीवर पलटी झाली. यानंतर या जीपमध्ये उभे असलेले 8 ते 10 जण थेट जीपखाली आले. त्यामुळे या अपघातात 8 ते 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
स्पर्धा पाहण्यासाठी याठिकाणी शेकडो नागरिक उपस्थित असल्याने त्यांनी तातडीने जीप पलटी झालेल्या ठिकाणी धाव घेत मदतकार्य सुरु केले. नागरिकांनी जीपखाली दबलेल्यांना बाहेर तत्काळ मदतकार्य सुरु केले. दरम्यान, आतापर्यंत या अपघातात जिवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, जीप पलटी झालेली तीव्रता पाहत अनेकांना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्साहाच्या भरात सुरक्षेची काळजी न घेतल्यास काय परिणाम होतात, यांचा अंदाज देणारा अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.