
मुंबई : कोल्हापूरच्या सुपुत्री फ्रान्समधील जगप्रसिद्ध शॅनेल या फॅशन जगतातील बड्या कंपनीच्या सीईओ लीना नायर यांची यंदाच्या इकॉनॉमिक टाइम्सच्या ग्लोबल इंडियन पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
इकॉनॉमिक टाईम्सने कॉर्पोरेट जगतात उत्तम कामगिरी करणार्या व्यक्तींसाठी सात पुरस्कारांची घोषणा केली असून त्यात लीना नायर यांचा समावेश आहे. या पुरस्कारांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना रिफॉर्मर ऑफ द इयर, ए. एम. नाईक यांना जीवनगौरव, सी. के. व्यंकटरमन यांना बिझिनेस लिडर ऑफ द इयर, रमेश जुनेजा व राजीव जुनेजा यांना आँत्रप्रेनर ऑफ द इयर आणि हिना नागराजन यांना ‘बिझनेसवुमन ऑफ द इयर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
लीना नायर या कोल्हापुरातील ज्येष्ठ उद्योगपती स्व. राम मेनन यांच्या भाची असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केले आहे. त्यांचा जन्म कोल्हापूरचा असून होलिक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण न्यू कॉलेजमध्ये झाले. त्यांनी सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. तसेच सेंट झेव्हियर्समधून व्यवस्थापनशास्त्राचे सुवर्णपदक पटकावले. त्यांनी युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीत मुख्य मनुष्यबळ अधिकारी म्हणून काम पाहिले. सध्या त्या जगभरातील प्रसिद्ध अशा शॅनेल या फॅशन उद्योगाच्या सीईओ आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta