कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी उद्या (15 एप्रिल) हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून ते बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे. ही लढाई एकट्याची नसून आपल्या सर्वांची आहे हे दाखवण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दसरा चौकात सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे. राजू शेट्टी चौथ्यांदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये रिंगणात असून त्यांच्यासमोर तब्बल चार उमेदवारांचे आव्हान आहे.
शेट्टी यांच्यासह या मतदारसंघामध्ये महायुतीचे धैर्यशील माने, वंचितचे डीसी पाटील, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरूडकर यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये आता पंचरंगी लढत झाली आहे.
संजय मंडलिक आणि धैर्यशील माने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार
दुसरीकडे कोल्हापुरातील शिंदे गटाचे दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे सुद्धा उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संजय मंडलिक हे कोल्हापूर लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर धैर्यशील माने हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार अर्ज दाखल करतील. दोन्ही उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शक्तीप्रदर्शन सुद्धा या निमित्ताने केलं जाणार आहे.