कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी सहा व टपाली मतदानासाठी एक अशा प्रत्येकी सात मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे रंगीत तालीम आणि प्रशिक्षण त्या त्या लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हातकणंगले संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उप जिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, सर्व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तसेच विविध विभागांचे नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघ अंतर्गत मतमोजणी कक्षास निवडणूक निरीक्षक रोहित सिंह यांनी भेट देवून आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षातील टेबलची रचना, उमेदवार प्रतिनिधी आसन व्यवस्था, सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था, माध्यम कक्ष, मतमोजणी ठिकाणी येण्या-जाण्याचे मार्ग आदी विषयांबाबत पाहणी करुन कामाबाबत आढावा घेतला. यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे, उप जिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.
दुपारी सर्व मतमोजणी अधिकारी कर्मचारी यांची मतमोजणी विषयक रंगीत तालीम घेण्यात आली. मतमोजणी दिवशी सकाळी सहा वाजता सर्व अधिकारी, मतमोजणी कर्मचारी मतमोजणी केंद्रांवर उपस्थित राहतील. यानंतर कर्मचाऱ्यांचे ‘रॅन्डमायझेशन’ होईल. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कोणत्या टेबलवर नियुक्त केले, हे स्पष्ट होणार आहे. त्यानुसार संबंधित कर्मचारी टेबलवर जातील. सकाळी सात वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉगरूमचे सील काढण्यात येईल. सकाळी आठ वाजेपर्यंत पोस्टातून आलेले टपाली मतदान स्वीकारले जाईल. यानंतर सर्व टपाली मतपत्रिका टपाली मतमोजणी केंद्रांत एकत्र केल्या जातील. सैनिक मतदारांच्या मतपत्रिकांचे स्कनिंग सुरू होईल. सकाळी आठ वाजता मतदारसंघनिहाय, मतदान केंद्र क्रमांकानुसार प्रत्येकी 14 ईव्हीएम टेबलवर आणून ठेवली जातील. सकाळी साडेआठ वाजता ईव्हीएमवरील मतमोजणीला सुरुवात होईल.