Sunday , September 8 2024
Breaking News

बेळगावचा खासदार कोण?

Spread the love

 

बेळगाव : उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. केंद्रात सत्ता कोणाची येणार? याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. मात्र बेळगाव लोकसभेची जागा नेमकी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
बेळगाव दक्षिण, गोकाक, अरभावी, बैलहोंगल मतदारसंघात भाजपचे वर्चस्व दिसत असले तरी देखील भाजपने आयात केलेला उमेदवार असल्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजीचे सूर प्रचारादरम्यान दिसत होते. तर दुसरीकडे काँग्रेसने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांना रिंगणात उतरविले. मृणाल हेब्बाळकर राजकारणात नवीन असले तरी बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर, सौंदत्ती, रामदुर्ग मतदार संघाबरोबर लिंगायत समाज मृणाल यांच्या पाठीशी असल्यामुळे या भागात काँग्रेसला मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे लक्ष्मीपुत्र मृणाल तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री असलेले जगदीश शेट्टर असल्यामुळे बेळगाव खासदारकीची लढत ही तुल्यबळ असणार आहे.
भाजपाने लोकसभेसाठी स्थानिक उमेदवारांना डावलून बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे भाजपच्या गोटात काहीशी नाराजी पसरली होती मात्र मोठा राजकीय अनुभव असलेल्या जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील मतदारांची त्याचप्रमाणे भाजप कार्यकर्त्यांची नाराजी शमविण्यात बाजी मारली. बेळगाव लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समिती आपली ताकद वाढविण्यासाठी लढ्याचा एक भाग म्हणून लोकसभा निवडणूक लढवीत असते. यावेळेस देखील महाराष्ट्र एकीकरण समितीने एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रचारातील नियोजन कोलमडल्यामुळे म्हणावा तसा समितीचा प्रचार झालेला नाही. त्यातच काही हेकेखोरांच्यामुळे प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ता हा निवडणुकीपासून लांब राहिला. त्याचाच परिणाम म्हणून मराठी भाषिकांची बहुतांश मते ही हिंदुत्व म्हणून भाजपकडे वळल्याचे चित्र बेळगाव ग्रामीण, उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात पहावयास मिळाले. त्यामुळेच मराठा समाज आणि लिंगायत समाजाची मते आपल्याला मिळतील व आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास जगदीश शेट्टर यांना आहे.
बेळगाव दक्षिण, गोकाक, अरभावी, बैलहोंगल या मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे त्याचप्रमाणे देशात चाललेली मोदी लाट व हिंदुत्व या मुद्द्यांवर बेळगाव लोकसभेची जागा भाजप यावेळी जिंकेल असा विश्वास व्यक्त केला जात असला तरी देखील लक्ष्मी हेब्बाळकर यांची कार्यप्रणाली बरोबर ग्रामीण मतदारसंघावर असलेली त्यांची पकड पाहता मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी देखील ही निवडणूक अगदी सहज-सोपी होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक मतदारांपर्यंत मृणाल हेब्बाळकर हे पोचले होते. त्या वेळेपासूनच त्यांनी कार्यकर्त्यांची संघटना मजबूत केली होती. त्यामुळे तिकीट जाहीर होण्यापूर्वीपासूनच मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचाराला जोर आला होता त्यामुळे त्यांनाही विजयाचा विश्वास आहे. जगदीश शेट्टर यांच्यासारखा अनुभवी व मातब्बर राजकारण्याविरुद्ध लढाई असल्यामुळे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर हे अतिशय सावधपणे या निवडणुकीला सामोरे गेले. राज्यातील काँग्रेस सरकारची ताकद आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नियोजनबद्ध कार्यप्रणालीमुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. काँग्रेसने बेळगाव लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक दृष्टीने काम केले. मात्र तो उत्साह महाराष्ट्र एकीकरण समिती किंवा भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसलेला नाही. ग्रामीण मतदारसंघातील महिलांवर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची पकड घट्ट असल्यामुळे या भागात काँग्रेसला एक गट्टा मतदान झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ग्रामीण मतदारसंघात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे रेकॉर्ड त्यांचेच पुत्र मृणाल हेब्बाळकर मोडणार असा विश्वास जाणकार व्यक्त करीत आहेत. एकंदरीत बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचा तिकीट वाटपावेळी झालेला गोंधळ, महाराष्ट्र एकीकरण समितीची निष्क्रियता त्यामुळे महत्त्वाची मते काँग्रेसच्या बाजूने झुकत असल्याचे दिसून येत आहे. मात्र दोन्ही पक्षांमध्ये थेट आणि बरोबरीची लढत होणार हे मात्र नक्की.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *