कोल्हापूर : कोल्हापूर शास्वत विकास परिषदेसाठी उद्या मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार आहेत. त्यांनी आणि पूर्वीच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ आणि सर्किट बॅचच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार असलेल्या दिवशीच म्हणजे मंगळवारी कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय रविवारी हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत अध्यक्षस्थानी होते. माजी महापौर आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली.
बैठकीत सर्वच वक्त्यांनी कोल्हापूर बंद करूनच मुख्यमंत्री शिंदे यांचे या दोन मागण्यांकडे लक्ष वेधावे, अशी जोरदार मागणी केली.
कृती समितीचे ऍड. बाबा इंदलकर म्हणाले, राजकीय अनास्थेमुळे हद्दवाढ, सर्किट बॅचची मागणी पूर्ण झालेली नाही. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यावेळी कोल्हापूर कडकडीत बंद करण्यासाठी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता बिंदू चौकात एकत्र येऊ. तेथून शहरात मोटारसायकल रॅली काढून बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन करू, याशिवाय मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचे पोस्टर तयार करून त्याला काळे फासू, पोलिसांचे कडे तोडून मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवू.
बार असोसिएशनचे अध्यक्ष खोत म्हणाले, हद्दवाढ, सर्किट बेंचच्या मागण्या अनेक वर्षांपासूनच्या आहेत. या मागण्या पूर्ण होण्यासाठी जनरेट्याची आवश्यकता आहे. सर्किट बेंचसाठी सहा जिल्ह्यांचा पाठिंबा आहे. सन २०२५ मध्ये मुख्य न्यायमूर्तींनी कोल्हापुरातच सर्किट बेंच होण्यासंबंधीचा अहवाल दिला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायमूर्तीना भेटून ही मागणी पूर्ण करून घ्यायची आहे; पण २०१५ ते २०२४ अखेपर्यंत मुख्यमंत्री यासाठी भेटू शकलेले नाहीत. म्हणून सर्किट बेंच, हद्दवाढीसाठी जो निर्णय कृती समितीच्या बैठकीत होईल, त्याला बार असोसिएशनचा पाठिंबा राहील.
किशोर घाटगे म्हणाले, यापूर्वीच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ, सर्किट बॅचची मागणी पूर्ण केलेली नाही. म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनाच विरोध करणे चुकीच आहे. हद्दवाढीला विरोध करणारे शुक्राचार्य कोण आहेत ते शोधून त्यांच्या घरांवरही काळे डोंडे घेऊन गेले पाहिजे. तर ऍड. महादेवराव आडगुळे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच हद्दवाढ करण्यासंबंधीचा निर्णय घेण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री असताना दिले होते. ते आता मुख्यमंत्री आहेत, त्यांनी हद्दवाढीचा निर्णय घ्यावा. झारीतील शुक्राचार्य शोधण्याऐवजी हद्दवाढीचा निर्णय त्यांनी घ्यावा.
यावेळी बाबा पार्टे, दिलीप देसाई, अशोक भंडारे, बाबूराव कदम, चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, पद्मा तिवले, दिलीप पोवार, अनिल घाटगे, सचिन चव्हाण, ऍड. रणजित गावडे यांची भाषणे झाली. बैठकीस ऍड. प्रशांत शिंदे, निशिकांत पाटोळे, व्ही. आर. पाटील, संभाजीराव जगदाळे, आदी उपस्थित होते.