कोल्हापूर : सर्व धर्मियांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि सामाजिक परिवर्तनाची लढाई लढणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची कास धरुन गुण्यागोविंदाने राहणाऱ्या करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडविण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी आम्ही विचलित होणार नाही, तर प्रतिगाम्यांचे हे प्रयत्न अधिक ताकदीने हाणून पाडू, असा संदेश देत कोल्हापुरातील सर्वधर्मियांनी आज, गुरुवारी शहरातून शिव-शाहू सद्भावना यात्रा काढून एकीचे दर्शन घडविले. या सद्भावना यात्रेत हजोरोंचा जमाव सहभागी झाला होता.
विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याच्या मागणीवरुन पेटलेल्या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केल्यामुळे उद्भवलेल्या हिंसाचारात विशिष्ठ समाजाला टार्गेट करुन समाजकंटकांनी जो धिंगाणा घातला, त्याचा तीव्र निषेध करण्याकरिता तसेच आम्ही तुमच्या असल्या भ्याड कृत्यांना घाबरणार नाही हे सांगण्यासाठी कोल्हापुरातील इंडिया आघाडीचे नेते तसेच समस्त पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी या सद्भावना यात्रेचे आयाेजन केले होते. अपेक्षेप्रमाणे या सद्भावना यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.
नर्सरी बागेतील राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकापासून गुरुवारी दुपारी पाच वाजता सुरु झालेली ही सद्भावना यात्रा चिमासाहेब महाराज चौक, सीपीआर चौक, भाऊसिंगची रोड, महापालिकामार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली. तेथे या सद्भावना यात्रेची सांगता झाली. ही यात्रा मुक होती, त्यामुळे कसल्याही प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या नाहीत. यात्रेत तिरंगा ध्वज, संविधानाची प्रत, राष्ट्रपुरुषांचे फलक पहायला मिळाले.
सर्वधर्मिय समुदाय सद्भावना यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. या यात्रेचे नेतृत्व खासदार शाहू छत्रपती, विधान परिषदेतील कॉग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह पुरोगामी कार्यकर्त्यांनी केले.