ऑलिम्पिक दर्जाची शुटींग रेंज कोल्हापुरात तयार होण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ
चांदीची गदा व मानपत्र देऊन दसरा चौकात भव्य सत्कार
कोल्हापूर : शिव, शाहूंच्या या महाराष्ट्राच्या मातीत जे घडतात ते देशाचं नाव गाजवतातच! शिवाजी महाराजांचे मावळे जसे महाराजांसाठी लढत असत त्याचप्रमाणे खेळात उत्तम कामगिरी करुन कोल्हापूरचे आणि आपल्या देशाचे नाव जगभरात उज्वल करेन. कांस्य पदक हा पहिला टप्पा असून आपल्या देशासाठी गोल्ड मेडल मिळवणे हे माझे स्वप्न आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छेने आणि आई अंबाबाईच्या आशिर्वादाने “मी गोल्ड मेडल मिळवणारच”, असा विश्वास ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळे याने व्यक्त केला.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळे याचा पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते चांदीची गदा व मानपत्र देऊन भव्य गौरव करण्यात आला. यावेळी स्वप्निलची आई अनिता, वडील सुरेश कुसाळे, भाऊ सुरज कुसाळे व कोच दिपाली देशपांडे यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व क्रीडाप्रेमी तसेच कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने भव्य आणि जल्लोषी मिरवणूक काढून सन्मान केल्याबद्दल लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, सर्व यंत्रणा, मित्रपरिवार व सर्व कोल्हापुरकरांचे स्वप्निलने आभार मानले. तसेच प्रतिकुल परिस्थितीतूनही नेमबाजीसाठी आवश्यक त्या सुविधा दिल्याबद्दल कुटुंबियांचे ऋण व्यक्त केले. श्री. कुसाळे म्हणाले, जगभरात भारत देशाला अनेक चांगल्या गोष्टींसाठी ओळखले जाते. खेळामध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन देशाचे नाव सर्वदूर पोहचवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. माझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि आशिर्वाद माझ्यासोबत कायम राहू देत, असे आवाहन करुन वेडं झाल्याशिवाय इतिहास घडत नाही, म्हणून कोणत्याही क्षेत्रात नाव कमवायचे असेल तर त्या क्षेत्रात झपाटून, वेडं होवून काम करा.. यश तुमचेच, असा संदेश स्वप्निलने विद्यार्थी व युवकांना देवून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानले.
आपल्या देशाची किर्ती आंतराष्ट्रीय स्थरावर वाढविणार्या, स्वप्निल कुसाळेचे हार्दिक स्वागत.
वंदेमातरम।
जय भारत माता कि।