कोल्हापूर : मराठीतील ज्येष्ठ लेखक महादेव मोरे यांचे दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. लेखक महादेव मोरे यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिठाची गिरण चालवली. जगण्यासाठी चाललेल्या विविध व्यापातूनही आपल्या साहित्य लेखणीत कधीही खंड पडू दिला नाही. कथा, कादंबरी, ललित अशा विविध साहित्य प्रकारांत लेखन केले. समाजातील कष्टकरी, ट्रक ड्रायव्हर, तंबाखू-विडी कामगार अशा उपेक्षित घटकातील अनेकांशी त्यांचा संबंध आला. त्यांचे जगणे, शोषण व संघर्ष त्यांच्या लेखनाचा भाग झाले. मराठी साहित्य विश्वात या नव्या लेखनाची भर पडली. आज मराठी विभागात श्री. महादेव मोरे यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी निपाणी गावच्या, सीमाभागातील साहित्यिकाची शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाने ‘लेखक संवाद’ उपक्रमात डॉ. रमेश साळुंखे यांनी घेतलेली मुलाखत व पीठाक्षरं हा माहितीपट पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आज विभागात दाखवण्यात आला.
याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी श्री. महादेव मोरे यांच्या वाङ्गयीन जीवनाची जडणघडण यावर भाष्य केले. तसेच डॉ. रणधीर शिंदे यांनी महादेव मोरे यांनी लेखनातील दुर्लक्षित वंचित घटकांच्या जीवन जाणिवांचा वेध घेत त्यांच्या साहित्य लेखनाची वैशिष्ट्ये यावर भाष्य केले. याप्रसंगी विभागातील सर्व शिक्षक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.