कोल्हापुरात राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
कोल्हापूर : हिंदुस्थानात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एक विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी, संविधानाचे रक्षण करणारी तर दुसरी विचारधारा शिवाजी महाराजांच्या विचारांचे संविधान संपवण्याच्या विचारांची आहे. विचारधारा अंमलात आणणार नसाल तर पुतळा उभारण्याला अर्थ नाही. शिवरायांचे विचार पाळले नाहीत म्हणून सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केली. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण आज (दि. ५) राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा बहुशस्त्रधारी भव्य पुतळा साकारला आहे. या पुतळ्याचे अनावरण आज राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, शिवाजी महाराज ज्या विचारसरणीच्या विरोधात लढले त्याच विचारसरणीविरोधात आज काँग्रेस पक्ष लढत आहे. भाजपने शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला आणि काही दिवसांनी पुतळा कोसळला, कारण त्यांचा हेतू चुकीचा होता. शिवाजी महाराजांचा पुतळा बनवायचा असेल तर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचे रक्षण करावे लागेल, असा संदेश भाजपला त्यातून दिला आहे. भाजपची विचारधाराच चुकीची आहे. त्यांनी आदिवासी राष्ट्रपतींना राम मंदिर आणि संसदेच्या उद्घाटनाला येऊ दिले नाही. हा राजकीय लढा नसून विचारधारेचा लढा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.