कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये धक्क्या पाठोपाठ धक्के बसत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसने काही विद्यमान आमदारांची तिकीटे कापली व त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली नाही यामध्ये ज्या दोन आमदारांवर राज्यसभेला आणि विधान परिषदेला क्रॉस वोटिंग केल्याच्या संशय होता त्यांना तिकीट नाकारले. तथापि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार जयश्रीताई जाधव यांचे तिकीट का नाकारले याचे गौडबंगाल अद्याप उत्तरच्या जनतेला समजलेले नाही. चंद्रकांत जाधव यांच्या अकाली मृत्यूनंतर सहानुभूतीची लाट मतदानात वळवावी या उद्देशाने काँग्रेसने महाआघाडीच्या वतीने कोल्हापुरातील उत्तरच्या पोटनिवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्रीताई जाधव यांना मैदानात उतरवले आणि सहानुभूतीच्या लाटेवर त्यांना विजयी करून आमदार बनवले त्यानंतर जयश्री ताईंनी सातत्याने काँग्रेसच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत प्रत्येक गोष्टीत नेते मंडळींना विचारल्याशिवाय आपले कुठलेच कार्यक्रम किंवा निर्णय घेतले नाहीत. पक्षाच्या एखाद्या प्रामाणिक सैनिकाप्रमाणे त्यांची कारकीर्द ठळकपणाने उठून दिसली परंतु जेव्हा 2024 च्या विधानसभा निवडणुक धाम धूम सुरू झाली तेव्हा महाआघाडी आणि काँग्रेस नेतृत्व जयश्रीताईंना पूर्णपणे विसरून गेले. त्यांना विश्वासात घेऊन नवीन उमेदवार निवड झाली असती तर त्या निश्चितच पक्षाबरोबर आणि आघाडी बरोबर राहिल्या असत्या मात्र जयश्रीताईंचा उल्लेख कुठेच न होता अचानकपणे कार्यकर्ता पॅटर्न म्हणून राजेश लाटकर यांची उमेदवारी घोषित झाली पण 48 तासात स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे ती मागे घ्यावी लागली आणि त्या ठिकाणी मधुरिमा राजे यांची उमेदवारी जाहीर झाली, उमेदवारी अर्ज भरण्याला अवघा एक दिवस बाकी असताना हा बदल म्हणजे जनतेला एक भूकंपाचा धक्काच होता या धक्क्यातून जनता सावरते न सावरते तोच या सगळ्या घडामोडीतून दुखावले गेलेल्या जयश्रीताईंनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.