जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा शिल्लक असून आता मतदार जनजागृती व मतदान केंद्रावरील तयारी कामांना गती द्या. मतदानासाठी सर्व मतदान केंद्रे आवश्यक त्या सुविधांनी सज्ज ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी संजय शिंदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, आजवरच्या सर्व निवडणूकांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवत जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या. जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात त्या त्या भागाशी निगडीत वैशिष्ट्यांवर आधारीत वैशिष्ट्यपूर्ण (थिमॅटीक) मतदान केंद्रे उभी करण्यासाठी आवश्यक ती तयारी वेळेत पूर्ण करा. मतदान केंद्रावर येणारे नवमतदार, ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांचे स्वागत करा. मतदान केंद्रावर सर्व मतदारांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी चोख नियोजन करा. पिण्याचे पाणी, रॅम्प, सावली, व्हील चेअर तसेच बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था, स्वच्छतागृह असल्याची खात्री मतदानाच्या दोन दिवस आधी करा. माध्यमांमध्ये प्रसारीत होणाऱ्या आक्षेपार्ह बातम्यांवर लक्ष ठेवा. पेड न्यूज व फेक न्यूज आढळल्यास आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करा. निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून निवडणूका शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून आपापल्या जबादाऱ्या चोख पार पाडा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.