पती, पत्नी, मुलगा, मुलीचा समावेश
हुपरी : येथील संभाजी मानेनगरमधील एकाच कुटुंबातील चारजणांचा राजस्थामधील पाली येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. यामध्ये बाबुराव चव्हाण (वय 50), त्यांच्या पत्नी सौ. सारिका चव्हाण (38), मुलगी साक्षी (19) आणि मुलगा संस्कार (17) या चौघांचा मृत्यू झाला, तर पट्टणकोडोली येथील प्रमोद पुरंदर वळिवडे (40) व रवींद्र डेळेकर (32) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री घडली. हुपरी येथील हे कुटुंबीय सुट्टीत देवदर्शनासाठी गेले होते. जोधपूर पाहण्यासाठी गेल्यानंतर हा अपघात झाला.
बाबुराव चव्हाण गेल्या अनेक वर्षांपासून चांदीचे दागिने तयार करण्याचे काम करतात. त्यांचे भाऊ दत्तात्रय चव्हाण व ते दोघे एकत्रच व्यवसाय करतात. त्यांचे आदमापूर येथे ज्वेलर्स दुकानही आहे. दिवाळीनंतर सुट्टीसाठी ते मंगळवारी (दि. 12) राजस्थानला गेले होते. पत्नी, मुलगी आणि मुलासह ते रेल्वेने गेले होते. तिथे उद्योजकांना भेटले. काही प्रेक्षणीय स्थळेही पाहिली. तिथे त्यांना जुने व्यापारी भेटले. त्यामुळे त्यांची चारचाकी घेऊन जोधपूर पाहण्यासाठी गेले होते. जोधपूरला जात असताना रात्री पाली जिल्ह्यातील केनपुरा गावाजवळ चारचाकी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचाही जागीच मृत्यू झाला, तर पट्टणकोडोली येथील प्रमोद वळिवडे व रवींद्र डेळेकर हे दोघे गंभीर जखमी असून, त्यांना पाली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या जखमींची प्रकृती सुधारत आहे. बाबुराव व दत्तात्रय हे दोघे भाऊ प्रामाणिकपणे व्यवसाय करीत होते. त्यांच्या सुखी संसारावर काळाने मोठा घाला घातला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.