कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : गेल्या दोन महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात किती जणांवर कारवाई करण्यात आली आणि यातून किती दंड वसूल करण्यात आला याबद्दल पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी माहिती दिली. यानुसार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास २ टक्के लोकांवर विविध कारणांसाठी कारवाई करत कोट्यावधी दंड आकारण्यात आला आहे. दंड वसूल करणे हा आमचा प्रमुख उद्देश नसून नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावं हा आहे असं स्पष्ट करत, याचं नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.
दोन महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये, विनापरवाना सुरु ठेवण्यात आलेल्या एक हजार आस्थापना, हॉटेल्सवर कारवाई करत त्यांच्याकडून साडे बारा लाख दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या २४ हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्यांतर्गत १ लाख १० हजारांहून अधिकांवर कारवाई करत दीड कोटीहून अधिक दंड वसूल करण्यात आला. साडे आठ हजारांहून अधिक जणांवर वाहन जप्ती कारवाई करण्यात आली. जवळपास जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या २ टक्के इतक्या लोकांवर कारवाई करण्यात आली, याचा अर्थ इतर लोकांनी याकाळात सहकार्य केलं. यापुढेही नागरिकांनी सहकार्य करत, शासनाच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलं आहे.