चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड कोविड केंद्रातील कार्य व त्यांनी रुग्णांना दिलेले योगदान पाहता रुग्णांसाठी एक देवदूत ठरलेले डॉ. सुनील काणेकर यांचे कार्य कौतुकास्पद असून तालुक्यात सर्वत्र त्यांच्या कार्याची चर्चा होऊ लागली आहे.
चंदगड तालुक्यातील तरुण उद्योजक सुनील काणेकर यांनी पहाटे साडेचार वाजता उठून सुमारे 250 लोकांसाठी हळद, दालचिनी, पिंपळ, तुळशीचे पान घालून काढा बनवतात व आपल्या सवंगड्यांना घेऊन चंदगड आणि कानुरच्या केअर सेंटरमध्ये जाऊन काढा देतात. या काढ्याचा रुग्णांना उपयोग होत असून ऍलोपॅथिक औषधांबरोबरच काढ्याचा सहाय्याने रुग्ण बरे होत आहेत. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी यासाठीच ते कोविड केंद्रात जाऊन रुग्णांचे प्रबोधन करतात. त्यांच्यातील नकारात्मकता बाजूला करतात व ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी पाठी पोटाचे माॅलीस करतात. ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी कसे झोपावे पूर्वेकडे तोंड करून प्राणवायू मुद्रा कशा कराव्या याचे प्रात्यक्षिक दाखवतात. मन स्थिर आणि खंबीर होण्यास याचा लाभ होतो त्यातून रुग्ण बरे होतात. गेल्या वर्षभरापासून कोविड केंद्रात सुरू असलेल्या त्यांच्या अनेक कार्यामुळे सुनील काणेकर यांना देवदूत म्हणून रुग्ण ओळखत आहेत.