
बिंदू चौकात मेणबत्या प्रज्वलित करून हुतात्म्यांना अभिवादन
कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिले रक्त बेळगावात सांडले, जगाच्या पाठीवर सनदशीर मार्गाने हा लढा सुरू आहे. सीमाप्रश्नाचा हा लढा न्यायाचा असून महाराष्ट्रातील जनता सीमावासीयांच्या पाठीशी आहे. कर्नाटक सरकारची दादागिरी सुरू असून मराठी भाषिकांचे हाल सुरू आहेत. सर्वत्र कानडीकरण सुरू आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात बंदी घातली जाते. कर्नाटक मराठीपणा जपत नाही तर कानडीपण का जपायचे? असे प्रतिपादन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १७ जानेवारी १९५६ रोजी हुतात्मा झालेल्यांना अखिल भारतीय मराठा महासंघ कोल्हापूरच्या वतीने शुक्रवारी बिंदू चौकात अभिवादन करण्यात आले. यावेळी मेणबत्या प्रज्वलित करून हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “हुतात्मे अमर रहे…” अशा घोषणांनी बिंदू चौक दणाणून गेला.
महाराष्ट्र एकिकरण समितीचेसरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर म्हणाले, भाषावर प्रांत रचनेत आम्हाला कर्नाटकात डांबले गेले. केंद्र सरकारने न्याय्यतत्वाने सीमावासीयांची सोडवणूक करावी. बेळगाव परिसरात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. त्वरीत निर्णय द्यावा, अन्यथा तीव्र लढा उभा करू.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, युवा नेते आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडूस्कर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, पी. एन. हरगुडे, अशोक दळवी, आनंद म्हाळुंगेकर, बंकट थोडगे, विजयसिंह पाटील, अनिल घाटगे, चंद्रकांत चव्हाण, मेघा मुळीक, शैलजा भोसले, संयोगिता देसाई, वैजयंती साळुंखे, रोहिणी मुळीक, शोभा खेडकर यांच्या सह बेळगाव येथील समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta