
बेळगाव : सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे भारतातील पहिला ZEISS PENTERO 800 S हा अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप दाखल झाला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मेंदू आणि मणक्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी ही क्रांतिकारी सुविधा ठरणार आहे.
या मायक्रोस्कोपचे लोकार्पण महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाशिवरात्रीच्या दिवशी होणार आहे, अशी माहिती काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिद्धगिरी हॉस्पिटलमधील न्युरोसर्जरी विभागाने आतापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या आणि जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. आता या विभागाला आणखी सक्षम करण्यासाठी ZEISS PENTERO 800 S हा अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच कणेरी येथे दाखल झाला आहे. या मायक्रोस्कोपच्या मदतीने ग्रामीण भागातील रुग्णांना जागतिक दर्जाची उपचार सुविधा मिळणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे मेंदूवरील आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया अधिक अचूक आणि सुरक्षित होतील, अशी माहिती स्वामीजींनी दिली.
सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी सांगितले की, या अत्याधुनिक मायक्रोस्कोपमध्ये 4K – 3D कॅमेरा सिस्टम आहे, ज्यामुळे ऑपरेशनदरम्यान अधिक स्पष्ट आणि त्रिमितीय प्रतिमा दिसू शकते. तसेच, ऑपरेटिंग सर्जन आणि त्यांचे सहाय्यक एकाच वेळी मायक्रोस्कोपचा वापर करू शकतात. अंदाजे ३.५ कोटी रुपये किमतीच्या या उपकरणाचा वापर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय रुग्णांसाठी करण्यात येणार आहे. यासोबतच न्यूरो नेव्हिगेशन सिस्टीम, न्यूरो मॉनिटरिंग यंत्रणा, न्यूरो भूलतज्ज्ञ, स्वतंत्र न्यूरो आयसीयू, सीटी आणि एमआरआय सुविधा उपलब्ध असल्याने सिद्धगिरी हॉस्पिटलचा न्यूरो विभाग राष्ट्रीय स्तरावर नावारूपास येत आहे.
न्यूरो भूलतज्ज्ञ डॉ. प्रकाश भरमभौडर यांनी स्पष्ट केले की, या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान होणारा रक्तस्त्राव आणि शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या गुंतागुंती कमी होणार आहेत. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होऊन घरी जाण्यास मदत होणार आहे. या पत्रकार परिषदेला डॉ. स्वप्नील वळीवडे, डॉ. निषाद साठे, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, अमित गावडे यांसह हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते. विवेक सिद्ध यांनी प्रास्ताविक केले. रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta