Tuesday , March 3 2026
Breaking News

चांगभलंच्या गजरात रंगला जोतिबा यात्रेचा गुलाल; लाखो भाविकांची मांदियाळी

Spread the love

 

 

कोल्हापूर : गुलाल खोबऱ्याची उधळण. जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर, गगनचुंबी सासनकाठ्यांचा ऐट, त्यांचा भार सांभाळून नाचवताना तहान भूक विसरणारे भाविक, महापूजा, अभिषेक, आरती, सायंकाळी पालखी सोहळा अशा पारंपारिक उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा आज, शनिवारी पार पडली.
देव आणि भाविकांच्या भेटीचा हा अलौकिक सोहळा याची देही याची डोळा अनुभवताना कृतार्थ भाव प्रकटला. संपूर्ण परिसर गुलालाने न्हाऊन निघाला होता.

महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकसह देशभरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जोतिबा देवाची वर्षातील सर्वात मोठी चैत्र यात्रा उत्साहात पार पडली. देवाच्या भेटीच्या ओढीने गेल्या बैलगाडी, पायी, वाहनांमधून आठ दिवसांपासून अखंड प्रवास करत असलेले भाविक डोंगरावर विसावले. मंदिराचा कळस बघताच जोतिबाच्या नावाचा गजर झाला.

शनिवारी पहाटे ४ वाजता देवाची काकड आरती, मुख प्रक्षालन झाले. त्यानंतर पन्हाळा तहसीलदारांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. महापूजेनंतर देवाची सरदारी रुपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. दुपारी साडे बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते निनाम पाडळी येथील मानाच्या प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीचे पूजन झाले.

यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जोतिबा मंदिर व्यवस्थापक धैर्यशील तिवले, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *