रायगड : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे येत्या ५ व ६ जून रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी नुकतीच दुर्गराज रायगडाला भेट दिली. या भेटीत गडावरील विविध सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली, तसेच स्थानिक विक्रेत्यांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी गडावरील विक्रेत्यांना घरगुती पदार्थ विक्रीवर भर देण्याच्या सूचनाही दिल्या. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गडावर मिनी हॉस्पिटल उभारणे, शौचालयांची संख्या वाढवणे, शिवभक्तांच्या निवासाची विशेष सोय करणे, टेन्ट्स उपलब्ध करून देणे याबाबत सूचनाही त्यांनी दिल्या. प्रयागराज कुंभमेळ्याच्या धर्तीवर उपाय योजना करण्याच्या सुचना यावेळी प्रशासनास देण्यात आल्या.
याशिवाय पोलीस प्रशासन व शिवभक्त यांच्यात समन्वय राखण्याचे निर्देश देण्यात आले. शटल सेवेसाठी बसची संख्या वाढवून तीन चालकांसह वाहकही नियुक्त करण्याचे सुचवण्यात आले. गडपायथा येथील पार्किंग व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला.
या पार्श्वभूमीवर अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शिवभक्तांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही दिली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक रायगड अभिजीत शिवथरे, , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.रायगड सत्यजित बडे , उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके, कार्यकारी अभियंता सा.बां.विद्युत विभाग, पेण-रायगडपूजा सागर जाधव, कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग, महाड महेश रामहरी नामदे, रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील, रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे, कार्यकारी अभियंता महावितरण, पेण मंडळ रविकिरण पाटील, जिल्हा माहिती कार्यालाय अधिकारी मनिषा पिंगळे, महाड तहसिलदार महेश शितोळे, स्थापत्य विशारद, रायगड विकास प्राधिकरण वरूण भामरे, सा.बां.विभाग, महाड अभियंता स्वप्निल बुर्ले, तसेच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर, कार्याध्यक्ष सुखदेव गिरी, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, उपाध्यक्ष अतुल सतिश चव्हाण, उपाध्यक्ष सत्यजित भोसले, उपाध्यक्ष चैत्राली कारेकर, उपाध्यक्ष प्रशांत दरेकर, संजय पोवार, विनायक फाळके, प्रविण पोवार, राहुल शिंदे, विश्वास निंबाळकर महोत्सव समितीचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta