Sunday , December 7 2025
Breaking News

वादळी वाऱ्यामुळे, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love

 

नैसर्गिक आपत्तीचा आढावा

कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे शेती, फळपिके, घरे व गोठ्यांचे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरु करावे तसेच पथकांची नियुक्ती केली नसल्यास तातडीने आदेश निर्गमित करुन उद्यापासून पंचनाम्याचे काम सुरु करण्यात यावे. तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने अंतिम अहवाल जिल्हा कार्यालयास 31 मे 2025 पूर्वी सादर करण्यात यावा. जिल्ह्यातील निवारा केंद्राची जागा निश्चित करुन त्यामध्ये आवश्यक सुविधाची तपासणी करावी तसेच आवश्यक दुरुत्या दोन दिवसांत पूर्ण करुन तसा अहवाल सादर करावा. तालुकास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष 1 जून 2025 पासून पूर्ण वेळ कार्यरत ठेवावे, संबंधित कामकाज पाहणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत करावेत. त्याचबरोबर गावपातळीवरील सर्व आवश्यक संपर्क क्रमांक तपासणी करुन खात्री करावी. आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील व इतर प्रतिष्ठित व्यक्तींचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करुन गावामध्ये मीडिया ग्रुपवर पाठवावेत. गावपातळीवरील यंत्रणा सुसज्ज ठेवावी असे सांगून ते पुढे म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे घडणाऱ्या घटनांची तात्काळ नोंद घेऊन तालुका आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत जिल्हा नियंत्रण कक्षास कळविण्यात यावी, जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, धरणे, धबधबे येथे पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्यास वाहन वाहतूक थांबवून सूचना फलक लावण्यात यावे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील सुरक्षेची खबरदारी घ्यावी. पूर्वी घोषित केलेल्या 86 भूस्खलन संभाव्य गावांमध्ये सतर्क राहून आवश्यक उपाययोजना करण्यात यावे. इतर संभाव्य भूस्खलन स्थळांचीही पाहणी करुन संबंधित माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *