कोल्हापूर : जगात सर्वात खडतर समजले जाणारे अष्टहजारी अन्नपूर्णा 1 शिखर कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने सर केले. हे शिखर सर करणारी ती जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे. 24 मार्चपासून सुरू झालेल्या तिच्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. साधारणपणे 15 मे दरम्यान चांगली वेदर विंडो पाहून कस्तुरी एव्हरेस्ट शिखर गाठेल, अशी माहिती करवीर हायकर्सचे अरविंद कुलकर्णी व दीपक सावेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कस्तुरीची यापूर्वीची मोहीम खराब हवामानामुळे अर्धवट राहिली होती. यंदा तिने 24 मार्चला या मोहिमेला सुरुवात केली. माऊंट एव्हरेस्टला जाण्यापूर्वी गिर्यारोहकाला सरावासाठी एका शिखराची निवड करावी लागते. कस्तुरीने यासाठी अन्नपूर्णा शिखराची निवड केली होती. 27 एप्रिलला कॅम्प 4 (उंची 23,293 फूट) येथे पोहोचली होती. रात्री 8.30 ला अंतिम लढाईला सुरुवात केली. 28 एप्रिलला दुपारी 12.30 वाजता शिखर माथा (उंची 26,545 फूट) गाठण्यात ती यशस्वी झाली. तिथून 29 ला बेस कॅम्पला पोहोचली.
कस्तुरी आता काठमांडूहून लुक्ला येथे जाईल. तेथून ती एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाणार आहे. 15 मे दरम्यान चांगली वेदर विंडो पाहून ती एव्हरेस्ट समिटला सुरुवात करेल. या मोहिमेला अंदाजे 49 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी 23 लाख 72 हजार इतकी रक्कम जमा झाली आहे. तिच्या मोहिमेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करवीर हायकर्स व दीपक सावेकर यांनी केले आहे.
Check Also
मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे
Spread the love जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …